मुंबई : लोकसभेत दिलेला ४०० पारचा नाराच भाजपच्या पिछेहाटीचे कारण ठरला का? असा प्रश्न निकालानंतर सातत्याने विचारला जात आहे. अशातच आता भाजपच्या मित्र पक्षाचे नेतेही दबक्या आवाजात याच ना-यामुळे पराभवाचे तोंड पहावे लागल्याचे बोलत आहेत. दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनीही असेच वक्तव्य केले आहे.
४०० पारच्या ना-यामुळेच अनेक ठिकाणी कार्यकर्ते गाफील राहिल्याचे ते म्हणाले आहेत. अकोल्यासह राज्यात आणि देशात यामुळेच महायुतीची पिछेहाट झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या जाधव आणि अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांचा अकोल्यातील मराठा मंडळ मंगल कार्यालयात महायुतीने जाहीर नागरी सत्कार केला. त्या कार्यक्रमात प्रतापराव जाधव बोलत होते. देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे.
विदर्भातील भाजपची ब-यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी ७ मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप २ आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या १ ठिकाणी, असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआ, महायुतीसह इतर पक्षही जोमाने तयारीला लागले आहे.