23.5 C
Latur
Wednesday, September 25, 2024
Homeलातूर४३ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

४३ वर्षांत १५ वेळा भरले मांजरा धरण

लातूर : एजाज शेख 
केज तालुक्यातील धनेगाव येथे मांजरा नदीवर सन १९८० मध्ये मांजरा धरण बांधून पुर्ण झाले. सन १९८१ पासून या धरणात पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून म्हणजेच गेल्या ४३ वर्षांत मांजरा धरण केवळ १५ वेळा पुर्ण क्षमतेने भरले. पहिल्याच वर्षी या धरणात ११.४२० टक्के पाणीसाठा झाला होता तर दि. २५ सप्टेंबर रोजी या धरणातील पाणीसाठा ९५.५ टक्क्यांवर गेल्याने या धरणाचे दोन दरवाजे बुधवारी दुपारी उघडण्यात आले.
पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता मांजरा प्रकल्पाचे २ वक्रद्वारे (१, ६) हे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात १७३० क्यूसेक (४९.०० क्यूमेक्स) इतका विसर्ग  सोडण्यात आला आहे. तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे, मांजरा नदी काठावरील, पुरामुळे बाधित होणा-या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असणा-या मांजरा धरणावर या तीन जिल्ह्यांच्या २१ पाणीपुरवठा योजना अलंबुन आहेत. या धरणाच्या वरच्या बाजूस महासंगवी व संगमेश्वर हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. हे दोन्ही मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर मांजरा नदीत पाण्याचा येवा वाढतो आणि मांजरा धरणातील पाणीपातळी वाढत जाते. तसेच मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडला तर मांजरा धरण भरते. दरवर्षी परतीच्या पावसावरच मांजरा धरण भरते. मात्र यंदा पावसाळ्यात मांजरा धरण भरले आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आता सिंचनासाठीही पाणी उपलब्ध  झाले आहे. मांजरा धरण कालवा समितीची बैठक झाल्यानंतर आणि शेतक-यांकडून मागणी आल्यानंतर मांजरा धरणातून शेतीला पाणी सोडण्याचा विचार होऊ शकतो.
२२४.०९३ दशलक्ष घनमीटर प्रकल्पीय संचय क्षमता असलेलाा मांजरा धरणाात दि. २५ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष एकुण पाणीसाठा २१५.२८५ दशलक्ष घनमीटर होता. मृत पाणीसाठा ४७.१३० दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणीसाठा १६८.१३० दशलक्ष घनमीटर होता. पाणीसाठ्याची टक्केवारी ९६.०५ एवढी होती. मांजरा धरण आतापर्यंत १९८८-८९, १९८९-९०, १९९०-९१, १९९६-९७, १९९८-९९, २०००-०१, २००५-०६, २००६-०७, २००८-०९, २०१०-११, २०११-१२, २०१६-१७, २०१७-१८, २०२१-२२ व २०२२-२३ या १५ वर्षात भरले. तर १९८६-८७, १९९४-९५, १९९५-९६, २००१-०२, २००२-०३, २००३-०४, २००४-०५, २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६, २०१८-१९ आणि २०१९-२० या १३ वर्षांत मांजरा धरण कोरडे राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR