28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्या५ ‘व्हीआयपी’ जागांवर रंजक लढत

५ ‘व्हीआयपी’ जागांवर रंजक लढत

 

लातूर : निवडणूक डेस्क
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील पाच ‘व्हीआयपी’ जागांवरील चुरशीची लढत रंजक ठरली आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, २३४ मतदारसंघ सर्वसाधारण, २९ अनुसूचित जाती (एससी) आणि २५ अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव आहेत. या जागांसाठी एकूण १० हजार ९०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये ३३०२ जणांनी माघार घेतली. तर १६४९ जणांचे अर्ज बाद झाले.

१. वरळी : मुंबईतील वरळी विधानसभेच्या जागेवर यावेळी तिरंगी लढत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे गटाचे मिलिंद देवरा रिंगणात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे ही निवडणूक लढवत आहेत. मिलिंद देवरा हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. यूपीए-२ सरकारमध्ये ते मंत्री होते. संदीप देशपांडे स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत.

२. बारामती : बारामतीची जागा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र यावेळी पवार कुटुंबातच स्पर्धा आहे. या जागेवरून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. जनता काकांना निवडून देते की पुतण्याला हे पाहणे येथे औत्सुक्याचे ठरणार आहे. अजित पवार हे १९९१ पासून सलग सात वेळा या मतदारसंघातून आमदार आहेत. युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवत आहेत.

३. वांद्रे पूर्व : काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले झिशान सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. बाबा सिद्दीकी यांची नुकतीच हत्या झाली होती, त्यामुळे झिशान सिद्दीकी यांना जनतेची सहानुभूती मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. झिशान सिद्दीकी मुस्लीम समाजात लोकप्रिय चेहरा आहेत. वरुण सरदेसाई हा उद्धव ठाकरे यांचा पुतण्या आहे.

४. नागपूर (दक्षिण-पश्चिम) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग चौथ्यांदा नागपूर (दक्षिण-पश्चिम) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे रिंगणात आहेत. २००९ पासून नागपूर (दक्षिण-पश्चिम) मधून आमदार असलेले फडणवीस २०१९ मध्ये ४९,००० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. विकासकामांवर आणि भाजपच्या मजबूत संघटनात्मक पायावर त्यांची लोकप्रियता अवलंबून आहे. काँग्रेसचे प्रफुल गुडधे हे स्थानिक समस्या आणि शहरी पायाभूत सुविधांतील त्रुटींवरून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

५. कोपरी-पाचपाखाडी : या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केदार दिघे यांच्यात लढत आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. आनंद दिघे यांच्या कौटुंबिक आणि भावनिक संबंधांमुळे केदार दिघे यांना स्थानिक मराठी मतदारांचाही पाठिंबा मिळू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR