नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर आता पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २८ ऑगस्टपासून सुरू होणार असून, ८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या खेळांसाठी भारतीय पॅरालिम्पिक संघ शुक्रवारी रवाना झाला. यापूर्वी, भारतीय पॅरालिम्पिक समिती आणि केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी भारतीय दलासाठी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात नांदेडची गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव आणि भालाफेकपटू सुमित अंटील ध्वजवाहकाची भूमिका बजावणार आहेत.
भारतीय संघात तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, कॅनोइंग, सायकलिंग, अंध ज्युडो, पॉवरलिफ्टिंग, रोइंग, नेमबाजी, पोहणे, टेबल टेनिस आणि तायक्वांदो यासह १२ खेळांमधील ८४ खेळाडूंचा समावेश आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताचा हा सर्वात मोठा तुकडी आहे. टोकियोमध्ये ५४ अॅथलीट्सच्या टीमने भाग घेतला होता.
या समारंभात केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, आमच्या पॅरा अॅथलीट्समध्ये अडथळ्यांवर मात करण्याची आणि आव्हानांना संधींमध्ये बदलण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. त्यांनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या तयारीत दृढनिश्चय आणि चिकाटी दाखवली आहे. भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल यांचे पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ साठी भारताचे ध्वजवाहक म्हणून नामांकन करण्यात आले आहे. ते देशातील ८४ खेळाडूंच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहेत, असे मांडविया म्हणाले.
भारताचे २५ पदके जिंकण्याचे लक्ष्य
दरम्यान, २८ ऑगस्टपासून पॅरिस पॅरालिम्पिक सुरू होणार असून यामध्ये भारताचे ८४ खेळाडू १२ क्रीडा प्रकारांत सहभागी होतील. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकली होती. यावेळी भारताचे २५ पदकांचे लक्ष्य आहे. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. बॅडमिंटनपटू प्रमोद भगत मात्र या स्पर्धेला मुकणार असल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.