22.5 C
Latur
Friday, September 27, 2024
Homeउद्योग९० देशांना भारताकडून शस्त्रास्त्र निर्यात

९० देशांना भारताकडून शस्त्रास्त्र निर्यात

मेक इन इंडिया यशस्वी : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचे संरक्षण उत्पादन २०२३-२४ या आर्थिक वर्षात १.२७ लाख कोटी रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहे. आता भारत ९० हून अधिक मित्रदेशांना शस्त्रास्त्र, अन्य लष्करी उपकरणांची निर्यात करत आहे. भारतीय सशस्त्रदल आता भारतात निर्मित शस्त्रास्त्रांचा वापर करत आहे आणि देश जागतिक संरक्षण औद्योगिक पटलावर वेगाने उदयास येत आहे असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ स्ािंह यांनी काढले.

मेक इन इंडिया कार्यक्रमाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी ही माहिती दिली. भारताची संरक्षण निर्यात २०२३-२४ मध्ये पहिल्यांदाच २१ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिली आहे. संरक्षण मंत्रालयाने पुढील ५ वर्षांमध्ये हा आकडा वाढून ५० हजार कोटी रुपये करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. भारत जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांच्या मोठ्या आयातदारांपैकी एक आहे. भारतीय सशस्त्र दलांकडून २०२९ पर्यंत भांडवली खरेदीत सुमारे १३० अब्ज डॉलर्स खर्च होण्याचा अनुमान आहे. केंद्र सरकार आयात शस्त्रास्त्रांवरील निर्भरता कमी करू पाहत आहे. याचमुळे देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीकोनातून मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू केला होता. तेव्हापासून १० वर्षांनी संरक्षण क्षेत्रासमवेत प्रत्येक क्षेत्रात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये सरकारने देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि विशेषकरून चीनला लागून असलेल्या सीमेवर सैन्य सज्जतेला मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR