नवी दिल्ली : देशातील जनतेसह केंद्र सरकारला महागाईतून मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारी महिन्यात महागाई दरात सुमारे ०.६० टक्के घसरण झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये महागाई दर हा ५.१० टक्के राहिला आहे. तर डिसेंबर महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ५.६९ टक्क्यांवर होता. जो मागील चार महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला होता. जानेवारी महिन्यात हा आकडा ५.१० टक्क्यांवर आला आहे.
सांख्यिकी मंत्रालयाने जानेवारी महिन्यातील किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दरात घट झाली असली तरी पालेभाज्या आणि भाज्यांची महागाई चिंतेचे कारण आहे. पालेभाज्या आणि पालेभाज्यांचा भाव २५ टक्क्यांच्या वर तर डाळींचा भाव २० टक्क्यांच्या जवळपास आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये ८.३० टक्के आहे. जो डिसेंबर २०२३ मध्ये ९.५३ टक्के होता.
डिसेंबर २०२३ च्या तुलनेत जानेवारी २०२४ मध्ये डाळींच्या महागाईतकिंचित घट झाली आहे. जानेवारीमध्ये डाळींचा महागाई दर १९.५४ टक्के होता, जो डिसेंबर २०२३ मध्ये २०.७३ टक्के होता. भाज्यांच्या महागाई दरातही किंचित घट झाली असून, डिसेंबरमधील २७.६४ टक्क्यांवरुन तो २७.०३ टक्क्यांवर आला आहे. धान्य आणि संबंधित उत्पादनांचा महागाई दरही कमी झाला आहे. डिसेंबरमध्ये ९.९३ टक्के होता तो ७.८३ टक्के आहे. डिसेंबरमध्ये महागाईचा दर १९.६९ टक्क्यांवरून १६.३६ टक्क्यांवर आला आहे. फळांच्या महागाईचा दरही कमी झाला असून तो ८.६५ टक्के झाला आहे जो डिसेंबर २०२३ मध्ये ११.१४ टक्के होता.