जिंतूर : जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे ध्यान केंद्राचे बांधकाम चालू असताना मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वीज पडून १ जणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. यातील ४ जणांवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत तर २ जण अतीगंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठवण्यात आले आहे.
जिंतूर तालुक्यातील पाचलेगावात ध्यान केंद्राचे काम सुरू होते. अचानक वातावरण बदलले सोसाटयाच्या वा-यासह विजेचा कडकडाटास सुरूवात झाली. यावेळी वीज पडल्याने ३५ वर्षीय इस्राईल शेख गणी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत या ठिकाणी काम करणारे साजीद खान मनजीत खान, शेख जावेद शेख गणी हे २ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिंतूर येथे प्रथमोपचार करून त्यांना तात्काळ परभणीला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
याशिवाय अस्लम खान ताहेर खान, शेषबाज अब्जल पठाण, वाजीद खान पठाण, शेख मुख्तार शेख मोहमद या ४ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेतील मृत व्यक्तींसह जखमींना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.