मुंबई (प्रतिनिधी): केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मदतीसाठी हात सैल सोडला असून गेल्या ४ महिन्यांत राज्यात १ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात अग्रेसर ठरला आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबई महानगर प्रदेशातील विणले जात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी शनिवारी येथे केला.
गेल्या ४ महिन्यांत वाढवण बंदरासह विविध प्रकल्पांतून महाराष्ट्राला १ लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे आणि ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पांना १५ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. मेट्रो प्रकल्पांचा विस्तार मुंबई आणि पुणे शहरासाठी गेमचेंजर ठरणार आहेत. जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे महाराष्ट्रात आहे, असे देवरा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
काही लोक सत्तेत असताना मेट्रोला विरोध करत होते मात्र एमएमआर भागातील रहिवाशांच्या वेदना दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने शहरात अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित होत आहे. येत्या काळात एमएमआर क्षेत्रात १४ मेट्रो लाईन अस्तित्वात येतील. ज्यातून मुंबई महानगरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसची कार्यपद्धती लक्षात घेता काँग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती देणार नाही, असेही देवरा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.