23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयभारत-बांगलादेश यांच्यात १० करार

भारत-बांगलादेश यांच्यात १० करार

तीस्ता नदी प्रकल्पाबाबत सहमती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यामध्ये शनिवारी विविध क्षेत्रांबाबत विसृत चर्चा झाली. यामध्ये तीस्ता नदीचे संवर्धन आणि व्यवस्थानासाठीच्या मोठ्या प्रकल्पाच्या दृष्टीने भारताकडून तांत्रिक पथक त्वरित पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय व्यापक आर्थिक भागीदारी करारावर चर्चा सुरू करण्याच्या दिशेने पुढे जाण्यासह संरक्षण क्षेत्रातील संबंधांना प्रोत्साहन देण्यावर सहमती दर्शवण्यात आली. उभय देशांदरम्यान दहा करारांवर यावेळी स्वाक्ष-या करण्यात आल्या.

चीननेही तीस्ता नदी प्रकल्पात स्वारस्य दाखवल्याने त्याचे महत्त्व वाढले आहे. या प्रकल्पांतर्गत तीस्ता नदीच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यासाठी मोठे जलाशय आणि संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करण्याची संकल्पना आहे. दोन्ही देशांनी डिजिटल क्षेत्र, सागरी क्षेत्र, सागरी अर्थव्यवस्था, रेल्वे, हरित तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधे अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील संबंधांना बळकट करण्यासाठी १० करारांवर स्वाक्ष-या केल्या.

डिजिटल आणि ऊर्जा या क्षेत्रांत भारत-बांगलादेश सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांचा शोध घेण्यावर दोन्ही पंतप्रधानांच्या चर्चेचा मुख्य भर होता. याशिवाय दोन देशांमधील सीमांच्या शांततापूर्ण व्यवस्थापनासाठी काम करण्याचा संकल्पही त्यांनी केला. आपले आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेत व्यापक आर्थिक भागीदारी करारावर चर्चा सुरू करण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बांगलादेशहून उपचारांसाठी भारतात येणा-या लोकांसाठी भारत ई-मेडिकल व्हिसा सुविधा सुरू करणार आहे असेही ते म्हणाले.

बांगलादेशच्या निर्णयाचे स्वागत
संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही व्यापक चर्चा झाली. यामध्ये संरक्षण उत्पादन आणि सैन्य दलांचे आधुनिकीकरण याचा समावेश आहे. हिंद प्रशांत महासागर उपक्रमात सहभागी होण्याच्या बांगलादेशच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे मोदी यांनी नमूद केले. विकासात बांगलादेश भारताचा सर्वांत मोठा भागीदार असून त्याच्यासोबतच्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देतो, असेही त्यांनी सांगितले. भारत आमचा प्रमुख शेजारी आणि विश्वासू मित्र आहे. बांगलादेश भारतासोबतच्या संबंधांना मोठे महत्त्व देतो असे हसीना यांनी अधोरेखित केले.

गुंतवणुकीसाठी आमंत्रण
हसीना यांनी भारतीय कंपन्यांना देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यांनी द्विपक्षीय आर्थिक सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवरही प्रकाश टाकला. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना व्यापार क्षेत्रात मिळून काम करायला हवे, असे त्यांनी भारतीय उद्योग संघाच्या (सीआयआय) सदस्यांना संबोधित करताना सांगितले. तर, भारत आणि बांगलादेश विविध क्षेत्रांत आपले सहकार्य वाढवण्यासाठी वेगाने पुढे जात आहे. नव्या क्षेत्रांत प्रवेश करत आहे. यामुळे त्यांच्या संबंधांची भविष्यातील दिशा निश्चित होईल, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी सांगितले. हसीना यांची राष्ट्रपती भवनात मुर्मू यांची भेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR