नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मोठा दावा केला आहे. सरकारी नोक-या देण्यात सरकारने रेकॉर्ड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील एक ते दीड वर्षांत तब्बल १० लाख युवकांना सरकारी नोकरी दिल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. सोमवारीही तब्बल ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
देशभरातील ४५ ठिकाणी एकाचवेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी व्हीडीओ कॉन्फरिन्सिंगच्या माध्यमातून या मेळाव्यांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये ७१ हजार युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना मोदींनी सरकारची धोरणे आणि कार्यक्रमांमध्ये युवक केंद्रस्थानी असल्याचे सांगितले.
भरती प्रक्रियेमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगताना मोदी म्हणाले, मोठ्या प्रमाणात भरती झालेल्या महिला आहेत. महिला सर्वक्षेत्रात आत्मनिर्भर बनाव्यात, असा सरकारचा प्रयत्न आहे. महिलांसाठी २६ आठवडे मातृत्व सुटीचे धोरण त्यांच्या करिअरमध्ये फायदेशीर ठरल्याचेही मोदींनी सांगितले.
भारतातील युवकांच्या क्षमतेचा अधिकाधिक उपयोग करून घेणे, ही सरकारची प्राथमिकता आहे. स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया आणि अंतराळ तसेच संरक्षण क्षेत्रांमध्येही युवकांचा सहभाग आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये युवकांच्या विकासासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. प्रामुख्याने मातृभाषेच्या वापरावर जोर देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, आज झालेल्या ७१ हजार जणांच्या भरतीमध्ये २९ टक्के युवक ओबीसी समाजातील होते. मोदी सरकारने मागासवर्गातील घटकांना सरकारी भरतीमध्ये प्राधान्य दिले असून यूपीए सरकारच्या तुलनेत त्यामध्ये २७ टक्के वाढ झाली आहे. या भरतीमध्ये एससी आणि एसटी समाजातील युवक व युवतींचा अनुक्रमे १५.८ टक्के आणि ९.६ टक्के वाटा होता.