26.6 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeसोलापूर१० मानाच्या पालखी प्रमुखांना पूजेचा मान नाही

१० मानाच्या पालखी प्रमुखांना पूजेचा मान नाही

सहअध्यक्षांचे वक्तव्य, मुख्यमंत्री दाम्पत्य आणि मानाच्या वारक-यांच्याच हस्ते पूजा

पंढरपूर : प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी १० मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा निर्णयच झाला नसून चुकीच्या बातम्या आल्या, असे स्पष्टीकरण पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. आज झालेल्या मंदिर समिती बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याने नवा वाद होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले नाही. त्यामुळे यंदाची महापूजा मुख्यमंत्री दाम्पत्य आणि मानाचा वारकरी हेच करतील, असेही औसेकर यांनी स्पष्ट केले. आता यावरून वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.

आज आषाढी यात्रेच्या तयारीसाठी मंदिर समितीच्या बैठकीत हा नवा वाद समोर आला. १० मानाच्या पालखी प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे महापूजेसाठी पास देण्याची मागणी केली होती. मात्र आषाढी एकादशीला मंदिर हे प्रशासनाच्या ताब्यात असल्याने त्यांच्याशी चर्चा करून व मंदिर समितीमध्ये निर्णय घेऊनच या पासची व्यवस्था केली जाणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले. या १० मानाच्या पालखी प्रमुखांना पूजेच्यावेळी आत जाऊ द्यायचे का, असा विषय होता. यावेळी औसेकर महाराजांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

या मानाच्या पालखी प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना पास मागितला. मंदिर समितीला नाही असे सांगत समितीने थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयालाच एकप्रकारे आव्हान दिले आहे. यामुळे या १० प्रमुख मानाच्या पालखी सोहळ्यांना नेमका काय शब्द दिला, यावर आषाढीपूर्वीच नवीन वाद समोर येऊ शकतो. खरे तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री तर समस्त वारकरी संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून मानाचा वारकरी यांच्या हस्ते आषाढी एकादशीची शासकीय महापूजा होत असते. मात्र, यंदा १० मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना पूजेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतल्याचे आधी सांगितले जात होते. मात्र, मंदिर समितीने असा निर्णय झालाच नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही भूमिका सरकारच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

सध्या मंदिराचे नव्याने संवर्धनाचे काम होत असून यात नेमके काय होईल, याची आम्हालाही कल्पना नसल्याचे सांगत महापूजेच्यावेळी मंदिरात केवळ ६० व्हीआयपी बसू शकत असताना तीनशे ते साडेतीनशे व्हीआयपी आत येतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्वाची असल्याचेही औसेकर यांनी सांगितले.

चुकीच्या बातम्या पसरवल्या
महापूजेच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोणताही हस्तक्षेप नसून तसे त्यांचे वक्तव्यही नसल्याचे सांगत ज्यांनी अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या, यावर औसेकर यांनी ठपका ठेवला. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय भोसले यांनी यासंदर्भात माहिती माध्यमांना दिली होती. औसेकर यांच्या खुलाशानंतर अक्षय महाराज भोसले यांच्यावर उघडपणे मंदिर समितीने रोष व्यक्त केला. येथे अडचण जागेची असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवा वाद समोर येण्याची शक्यता
येत्या अधिवेशनापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेच्या निमंत्रण देण्यासाठी जाणार आहोत. त्यावेळी या सर्व गोष्टी त्यांना सांगू असे औसेकर यांनी सांगितले.आता मंदिर समितीच्या या भूमिकेनंतर मानाचे दहा पालखी सोहळा प्रमुखांची भूमिका महत्वाची ठरणार असून जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला असेल तर हा मंदिर समिती आणि मुख्यमंत्री यांच्यातील अधिकाराचा प्रश्न पुढे येणार आहे. त्यामुळे नवा वाद उद्भवू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR