राजौरी : जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामधील बड्डाल परिसरामध्ये एका रहस्यमय आजाराने खळबळ उडवली आहे. येथे या अज्ञात आजारामुळे ६ मुले आजारी पडली असून त्यापैकी ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही मुले घरात जेवण जेवल्यानंतर आजारी पडली. याच भागात महिनाभरापूर्वी चार मुलांसह पाच जणांचा असाच अज्ञात कारणामुळे मृत्यू झाला होता.
शनिवारी बड्डाल येथील मोहम्मद अस्लम हे आपल्या कुटुंबीयांसह फजल हुसेन यांच्या घरी गेले होते. तिथे भोजन करून घरी परतल्यावर त्यांच्या तीन मुलांची तब्येत बिघडली. या मुलांना आधी ताप आला, त्यानंतर उलट्या आणि घाम येऊ लागला. त्यांना गंभीर स्थितीत राजौरी येथील जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, शनिवारी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास जहूर अहमद (१४), नबीना (८) आणि यास्मिन अख्तर यांना रुग्णालयात आणण्यात आले. तर रविवारी मोहम्मद मारुफ (१०), सफीना (६) आणि जबीना कौसर हे आजारी पडले. आजारी पडलेल्या या सहा मुलांपैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य कर्मचारी घटनास्थळी
ही घटना उघडकीस आल्यानंतर राजौरी-पुंछ रेंजचे डीआयजी तेजिंदर सिंह, उपायुक्त अभिषेक शर्मा आणि एसएसपी गौरव सिकरवार यांनी बड्डाल गावाचा दौरा केला. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच स्थानिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या भागात रुग्णवाहिका, आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांना तैनात करण्यात आले आहे. तसेच इतर विभागांनाही सक्रिय करून सर्वसामान्यांना मदत मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, बड्डाल येथे अज्ञात आजारामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृ्त्यू झाला आहे. या घटनेने स्थानिकांना चिंतेत टाकले आहे. आता आरोग्य विभाग आजाराच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.