मुंबई : प्रतिनिधी
दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी १० टक्के हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला जातो. यंदाही २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान एका महिन्यासाठी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा एसटीने प्रवास करणा-यांना फायदा होणार आहे.
हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्याने महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. मात्र, या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले होते. एसटीची प्रस्तावित १० टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
रोज ६ कोटींच्या उत्पन्नावर पाणी
सध्या दिवसाला सुमारे २३ ते २४ कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र ६ कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नासह महिन्याभरात महामंडळाला ९५० ते १ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ऐन दिवाळीत अतिरिक्त उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.