21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयराज्यसभेच्या १० जागा रिक्त

राज्यसभेच्या १० जागा रिक्त

लोकसभा निवडणुकीत राज्यसभा खासदारांनी मारले मैदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात लोकसभा निवडणूक पार पडली. नरेंद्र मोदी यांनी देशात तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पीएम मोदींशिवाय आणखी ७१ मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदेही विभागली गेली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या १० जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये राज्यातील पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या.

यावेळी अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले. या स्थितीत राज्यसभेच्या १० जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये राज्यातील दोन जागांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवताना उत्तर मुंबईतून विजय मिळवला. साता-यातून उदयनराजे भोसले यांनी विजय मिळविला. रिक्त दोन्ही जागा भाजपच्या कोट्यातील आहेत. त्यामुळे या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याची उत्सुकता आहे.
पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेला अटीतटीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले. त्यामुळे त्यांना संधी दिली जाणार का, याचीही उत्सुकता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कोकण आणि मराठवाड्याला संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रादेशिक समतोल साधण्यासाठी या दोन विभागातून भाजपकडून कोणाला संधी दिली जाते, हे पाहावे लागेल.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल विजयी झाले. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा ३ लाख ५७ हजार मतांनी पराभव केला. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या उमेदवारांसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. साता-यातही राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी लोकसभेचे मैदान मारले. त्यामुळे त्यांची राज्यसभेची जागाही रिक्त झाली आहे.

या जागा रिक्त
कामाख्या प्रसाद तास (आसाम)
सर्बानंद सोनोवाल (आसाम)
मीसा भारती (बिहार)
विवेक ठाकूर (बिहार)
दीपेंद्रसिंग हुड्डा (हरियाणा)
ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश)
उदयनराजे भोसले (महाराष्ट्र)
पियूष गोयल (महाराष्ट्र)
के. सी. वेणुगोपाल (राजस्थान)
बिप्लब कुमार देब (त्रिपुरा)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR