सोलापूर : कुष्ठरुग्णांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात येतात. गत वर्षभरात राज्यातील १० हजार ७८५ कुष्ठरुग्णांनी या योजनांचा लाभ घेतला असून ते लाभार्थी आता स्वयंपूर्ण झाले आहेत.
राज्यातील कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी नोकरीत संधी निर्माण करुन देणे व कुष्ठरुग्णांना मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभाची व्याप्ती वाढविणे हा या समितीचा मुख्य हेतू आहे. राज्यात १९५५-५६ पासून राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गत ४० वर्षांत कुष्ठरुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सन २०२७ पर्यंतशस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या कुष्ठरुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व ठराविक स्वयंसेवी संस्थांमध्ये मोफत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया केल्या जातात. मोठ्या शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांना रुपये १२ हजार प्रोत्साहनपर भत्ता व शासकीय आरोग्य संस्थांना रुपये पाच हजार प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो.
कुष्ठरुग्णांना वर्षातून दोनवेळा मोफत एम.सी. आर., चप्पल, सतत डोळ्यांतून पाणी येत असल्यास संरक्षणासाठी गॉगल, कुष्ठरुग्णांची हाताची बोटे वाकडी असतील तर रुग्णांना मोफत स्प्लिंट्स, सर्व शासकीय रुग्णालये व स्वयंभू कुष्ठ वसाहतीमध्ये गरजेप्रमाणे मोफत व्रणोपचार सेवा व भौतिकोपचार सेवा, कुष्ठरुग्णांचे वैद्यकीय, आर्थिक व सामाजिक पुनर्वसन.
कुष्ठरोगाचा प्रसार शून्य करणे हे ध्येय निश्चित केले आहे.
त्यानुसार सन २०२५ पर्यंत जिल्हास्तर आणि तालुकास्तर व सन २०२७ अखेर गावपातळीवर प्रसार शून्यावर आणणे,असे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा आवास योजना, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व आर्थिक विकास महामंडळ, बँक लोन, दिव्यांग व्यक्तीसाठी बीजभांडवल, आर्थिक साहाय्य व स्वयंरोजगार आदी शासकीय योजनांच्या माध्यमातून कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन केले जात आहे.
कुष्ठरुग्णांना दिव्यांग सर्टिफिकेट, आवास योजना, शस्त्रक्रिया असे लाभ देण्यात येतात. ही नियमितची प्रक्रिया आहे. त्यांना अजून काही देता येईल का यासाठी विविध विभागांच्या समन्वयाने बैठक होते. यामध्ये काही स्वयंसेवी संघटनाही मदत करतात.असे सहसंचालक, कुष्ठरोग व क्षयरोग डॉ. संदीप सांगळे यांनी सांगीतले.