नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील आयटी क्षेत्र हे सर्वात मोठ्या रोजगार निर्मिती क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. परंतु फ्रेशर्सना कंपनीत रुजू होण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. याचा अर्थ असा की फ्रेशर्सना कॅम्पस प्लेसमेंट किंवा इतर पद्धतींद्वारे नियुक्त केले गेले होते परंतु ते अद्याप कंपनीत रुजू झाले नाहीत. रुजू होण्यास दोन वर्षांपेक्षा जास्त उशीर होत आहे.
गेल्या दोन वर्षांत भारतातील किमान १०,००० फ्रेशर्सना नोकरीची ऑफर देण्यात आली होती, परंतु आयटी कंपन्यांनी अद्याप त्यांना कंपनीत रुजू केलेले नाही. यासाठी, आयटी कर्मचारी युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटच्या डेटाचा हवाला देण्यात आला. अहवालानुसार, आयटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हरप्रीत स्ािंग सलुजा यांनी सांगितले की, उमेदवारांना टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, झेन्सर आणि एलटीआय माइंड ट्री या कंपन्यांमध्ये ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी अद्याप जॉईन केलेले नाही, फ्रेशर्सना कंपनीत रुजू होण्यास उशीर होत असल्यामुळे कामगार संघटनेशी संपर्क साधला आहे. अहवालानुसार, या तक्रारींमध्ये मोठ्या आयटी कंपन्यांचा समावेश आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपमधील व्यावसायिक अनिश्चिततेमुळे नवीन लोकांना रुजू होण्यास उशीर झाल्याचे अहवालात म्हटले आहे. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे नवीन नियुक्तीवर परिणाम होत आहे.
आयटी कर्मचा-यांच्या संख्येत घट
टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या आयटी प्रमुख कंपन्यांनी अलीकडेच आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीचे जाहीर केले. या सर्व कंपन्यांनी संपूर्ण आर्थिक वर्षात त्यांच्या एकूण कर्मचा-यांच्या संख्येत घट झाल्याचे सांगितले आहे. एकूणच, तीन प्रमुख सॉफ्टवेअर सेवा निर्यातदारांनी संपूर्ण आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६३,७५९ कर्मचा-यांंची घट झाल्याचे सांगितले.