मॉस्को : युक्रेन युद्धामुळे आर्थिक निर्बंध झेलत असलेल्या रशियासाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. रशियामध्ये पूर्व दिशेला सगळ्यात मोठ्या सोन्याचा खाणींचा खजाना सापडला आहे. या खाणी रशियाच्या पूर्व दिशेला असलेल्या चुकोटका येथे सापडल्या आहेत. या खाणीमध्ये 100 टन सोने असू शकते असे रशियाने म्हटले आहे.
सन 1991 मध्ये रशियाच्या विघटनानंतर रशियात प्रथमच एवढा मोठा सोन्याचा साठा सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. युक्रेन युद्धामुळे आर्थिक निर्बंधांचा सामना करणा-या रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
रशियाची सरकारी कंपनी रोसाटॉमच्या खनन विभागाने सोन्याच्या खाणी सापडल्याची घोषणा केली आहे. सोविनोय खाणीत ड्रिलिंगचे काम वर्षभर सुरु होते. गेल्या काही वर्षांत 32 किमीहून अधिक लांबीचे 123 खाणी खोदण्यात आल्या आहेत. यासाठी सर्वप्रकारच्या भुगर्भीय चाचण्या, भुवैज्ञानिक आणि भुरासायनिक आणि भूभौतिकीय कार्य पूर्ण झाले आहे. कंपनीने म्हटले आहे की, सोविनोय खाणींचे वार्षिक उत्पादन 2029 पासून तीन टन सोन्यापासून सुरु होणार आहे.