मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने सार्वजनिक खासगी भागीदारीत राज्यात सुरू केलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवा ही राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरली असून ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास १ कोटी रुग्णांना या रुग्णसेवेचा लाभ झाला आहे.
२६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस(एमईएमएस) प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत १०८ रुग्णवाहिकेने राज्यातील सर्व भागातील १ कोटीहून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. कोविड काळात या रुग्णवाहिकेने सहा लाख पेक्षा जास्त रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. कोविड काळात रुग्णाला बेड मिळणे अडचणीचे होते, या काळात अतिशय कमी वेळामध्ये १०८ कंट्रोल रूममधून खासगी रुग्णवाहिकांबरोबर समन्वय साधून रुग्णालयातील खाटांचे ‘रिअल टाइम’ उपलब्धतेसाठीही मदत करण्यात आली.
दहा वर्षात ४०,२१३ प्रसूती या रुग्णवाहिकेत झाल्या. एमईएमएस प्रकल्पामुळे माता मृत्यू दर ६८ वरून ४६ आणि बालमृत्यू दर २४ वरून १७ पर्यंत कमी झाला. रस्ते अपघात मृत्यूंमध्ये १४ टक्के घट झाली, असा दावा संंबंधित अधिका-यांनी केला आहे.
१२ हजार जणांना रोजगार
या प्रकल्पात सध्या राज्यातील सहा हजारपेक्षा जास्त तरुण कार्यरत असून, नवीन निविदेच्या व्याप्तीनुसार, शासन व आरोग्य विभागातर्फे बारा हजारपेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय शाळांमध्ये लाइफ सेव्हिंग ट्रेनिंग, ग्रामीण आणि शहरी भागात जीवन वाचवण्याचे प्रशिक्षण आणि १०८ सेवेच्या सक्रियतेबाबत प्रशिक्षण दिले आहे.
कुंभमेळ्यात, वारीत सेवा
एमईएमएस प्रकल्पाने नाशिक महाकुंभमेळ्यात एक लाख रुग्ण व साधूंची सेवा केली. पंढरपूर आषाढी वारी दरम्यान ३ लाखाच्या घरात अत्यवस्थ रुग्णांची सेवा केली. भारतातील सर्वोत्तम शासित प्रणाली म्हणून एमईएमएस प्रकल्पाला सन्मानित करण्यात आले असून आतापर्यंत विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.