नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ७८ दिवसांत ११ दहशतवादी हल्ले झाले असून गत अडीच महिन्यांत दहशतवादी हल्ल्याची झालेली वाढ चिंताजनक असल्याचे मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत, तर एक जण जखमी आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला असून, एक जखमी झाला आहे. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लान्स नाईक प्रवीण शर्मा आणि हवालदार दीपक कुमार यादव, अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत. कालपासून अनंतनागमध्ये ही चकमक सुरू आहे. गडोळेच्या जंगलात आणखी दोन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली असून, शोध मोहीम सुरुच ठेवण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसराचा घेराव घातला आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाण्याचा कुठलाही मार्ग नाही. लष्कर, निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांची फौज या परिसरात तैनात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरच्या विविध भागात दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. दहशतवादी सुरक्षा दलासोबतच सामान्य नागरिकांनाही लक्ष्य करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ७८ दिवसांत ११ दहशतवादी हल्ले झाले आहेत.
पाकच्या नापाक कारवायांचा पर्दाफाश
काश्मीर खो-यातील पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयच्या कारस्थानाबाबत मोठा खुलासा झाला आहे. दहशतवादी सीमेपलीकडून सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पीओकेच्या अनेक भागात दहशतवादी सक्रिय आहेत. आयएसआय या दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील २० भागात दहशतवादी सक्रिय आहेत. एलओसीवरील दहशतवादी हालचालींनंतर भारतीय लष्कर चोवीस तास अलर्ट मोडमध्ये आहे.
कधी झाले हल्ले?
– १५ जुलै- दोडा येथील धारी गोटे उरारबागी येथे हल्ला.
– ९ जुलै – डोडा येथील गढी भागवा येथे दहशतवादी हल्ला.
– ८ जुलै- कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला.
– ७ जुलै- राजौरी येथील लष्करी छावणीजवळ हल्ला.
– २६ जून – गंडोह, डोडा येथे दहशतवादी हल्ला.
– १२ जून- डोडा येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला, या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता.
– ११ जून – गंडोह, डोडा येथे दहशतवादी हल्ला.
– ११ जून – कठुआच्या हिरानगरमध्ये दहशतवादी हल्ला.
– ९ जून- रियासीमध्ये कटरा जाणा-या बसवर गोळीबार
– ४ मे – पूंछमध्ये हवाई दलाच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला.
– २८ एप्रिल- उधमपूरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात ग्रामरक्षक जखमी.