सोलापूर : महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार, यावर पैजा लागल्या आहेत.
सर्वाधिक चर्चेत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील हे जिंकतील, असे सांगून त्यांच्यावर तब्बल ११ बुलेटची पैज लावली आहे. हा पैजेचा विडा ठेवून तीन दिवस झाले तरी विरोधी भाजपकडून तो कोणीही अद्याप स्वीकारलेला नाही,
त्यामुळे मोहिते पाटील यांच्या विजयाचा दावा केला जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिस-या टप्प्यात ७ मे रोजी चुरशीने मतदान झाले. मतदानानंतर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचा दावा केला जात आहे. सोलापूरमध्ये मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अनुक्रमे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे जिंकणार असा दावा केला जात आहे. मनसेने एक लाख रुपयांचा ठेवलेला पैजेचा विडा राष्ट्रवादीकडून उचलण्यात आलेला आहे.