मुंबई : प्रतिनिधी
‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रविवारी पॅरिसला रवाना झाले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांसंदर्भातील राज्य शासनाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच याच्या सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीसाठी पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे.
या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी पॅरिस दौ-यात आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल आणि महाराष्ट्रातील या सांस्कृतिक वारशाचे महत्त्व अधोरेखित होईल, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सांस्कृतिक वारशाचे जतन सुनिश्चित होईल, असेही शेलार यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील १२ गड- किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत. हे गड-किल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचे उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणा-या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड-किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्यासाठी येतील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.