21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीसाठी मिळाले नामांकन

महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीसाठी मिळाले नामांकन

मुंबई : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणा-या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली.

मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार, १७व्या आणि १९व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरम केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR