नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यसभेच्या १२ जागांसाठी मतदान होणार नाही. सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणूक घेण्याची गरज भासणार नाही. ९ राज्यांमधील १२ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यात आसाम, बिहार, महाराष्ट्रातील प्रत्येकी २ जागा आणि हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणा, ओडिशातील प्रत्येकी एका जागेचा समावेश होता. राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी लोकसभा निवडणुकीत यश मिळवले. त्यामुळे १२ जागा रिक्त झाल्या होत्या. या बिनविरोध निवडीमुळे भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ वाढले आहे.
राज्यसभेच्या १२ जागांसाठी १२ जणच रिंगणात असल्याने बिनविरोध निवड झाली आहे. त्यात भाजपचे ९, अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रीय लोक मोर्चाच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आसामचे कामाख्या प्रसाद ताशा, सर्बानंद सोनोवाल, बिहारमधून मीसा भारती, हरयाणातून दिपेंद्र हुड्डा, मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्रातून छत्रपती उदयनराजे भोसले, पियूष गोयल, राजस्थानातून केसी वेणुगोपाल, त्रिपुरातून बिप्लब देव लोकसभेवर निवडून गेले. तसेच तेलंगणाच्या केशव राव, ओदिशातील ममता मोहंता यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्यसभेच्या १२ जागा रिक्त झाल्या. आता भाजपचे ९ जण राज्यसभेवर निवडून गेले.
महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, आसाममधून मिशन रंजन दास, रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरयाणातून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन, ओडिशातून ममता मोहंता, राजस्थानातून रवनीत सिंह बिट्टू, त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांची राज्यसभेवर वर्णी लागली. अजित पवार गटाचे नितीन पाटील, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहदेखील बिनविरोध निवडून आले.
आता भाजपचे संख्याबळ ९६ वर पोहोचले आहे तर एनडीएच्या खासदारांना धरून हा आकडा ११२ वर जातो. राज्यसभेत एकूण २४५ खासदार असतात. सध्याच्या घडीला ८ जागा रिक्त आहेत. त्यात जम्मू-काश्मीरच्या ४ आणि राष्ट्रपतींकडून निवडल्या जाणा-या ४ जागांचा समावेश आहे. सध्याच्या घडीला राज्यसभेतील बहुमताचा आकडा ११९ आहे. राष्ट्रपतींकडून निवडण्यात आलेल्या ६ जणांसह एका अपक्षाचा एनडीएला पाठिंबा आहे. त्यामुळे एनडीएचे संख्याबळ बहुमतापर्यंत जाते. त्यामुळे एनडीएला आता दुस-यांची मदत लागणार नाही.