23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाने नोंदविलेली १२ हजार नावे पुरवणी मतदार यादीतून गायब !

ठाकरे गटाने नोंदविलेली १२ हजार नावे पुरवणी मतदार यादीतून गायब !

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नोंदवलेली १२ हजार नावे कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने पुरवणी मतदारयादीतून वगळल्याचा आरोप या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गट तथा महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल परब यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने हि नावे जाणून बुजून सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याच आरोप त्यांनी केला.

यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने खासदार अनिल देसाई नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाला एक निवेदन दिले. देसाई यांच्या सोबत परब आणि आमदार विलास पोतनीस उपस्थित होते.त्यानंतर पत्रकार बोलताना परब म्हणाले कि, पुरवणी मतदार यादीमध्ये शिवसेनेने जी नावे नोंदवली होती, त्यातील बरीचशी नावे आलेली नाहीत. त्यांच्या फॉर्म स्वीकारल्याच्या पोच पावत्या आमच्याकडे आहेत. ज्यावेळेस फॉर्म दिला जातो त्यावेळेस तो तपासूनच त्याची पोच पावती दिली जाते. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पोच पावती येते.

ज्यावेळेस पोच पावती दिली जात नाही त्यावेळेस तो फॉर्म नाकारला जातो आणि त्याची कारणे दिली जातात. फॉर्म नाकारण्याची कारणे समजणे हा अधिकार आहे. मात्र ह्यावेळेस फॉर्म स्वीकारूनही नावे आलेली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. त्यामुळे ह्यामध्ये खुप मोठी गडबड आहे, असे परब म्हणाले. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वगळल्याचाही आरोप परब यांनी केला. आम्ही नोंदवलेली नावे आली नसली तरी सत्ताधारी पक्षाने जी नावे दिलेली आहेत ती मात्र सर्वच्या सर्व पुरवणी मतदार यादीत आलेली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग हे जाणूनबुजून सत्ताधारी पक्षाच्या निर्देशाखाली काम करत आहे असे वातावरण तयार झाले आहे, असा आरोप परब यांनी केला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR