हरारे : झिम्बाब्वेविरूद्धच्या अखेरच्या ट्वेंटी सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर ऐतिहासिक कामगिरी केली. खरे तर ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर १३ धावा करणारा यशस्वी हा जगातील पहिला खेळाडू ठरला.
त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. हा नो-बॉल असल्याने जैस्वालला फ्री हिटच्या रूपात आयती संधी मिळाली. मग आणखी एक षटकार मारून यशस्वीने एका चेंडूत १३ धावांची नोंद केली. पण, ज्या सिकंदरविरूद्ध यशस्वीने ऐतिहासिक कामगिरी केली त्याच जैस्वालला बाद करण्यात प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला यश आले. तो ५ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १२ धावा करून बाद झाला.
मालिकेतील सलामीचा सामना जिंकून यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली होती. मात्र त्यानंतर विजयाची हॅटट्रिक मारून भारताने मालिका खिशात घातली. अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दुस-या सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावण्याची किमया साधली.