24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीय१४ खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ

१४ खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ

केंद्राचा निर्णय, सोयाबीन, भात, ज्वारी, कापूस, मुगाचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१९ जून) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतक-यांसाठी मोठी घोषणा केली असून भात, कापूस यांच्यासह अन्य १२ पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली. सरकारच्या या निर्णयाचा शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.

आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तेलबिया आणि कडधान्यांसाठी एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. नायजरसीड (रामतील) प्रतिक्विंटल ९८३ रुपयांनी वाढले. त्यानंतर तीळ ६३२ रुपये प्रतिक्विंटल आणि तूर डाळ ५५० रुपये प्रतिक्विंटलने एमएसपीत वाढ झाली. शेतक-यांना एमएसपी म्हणून सुमारे २ लाख कोटी रुपये मिळतील, गेल्या हंगामापेक्षा हे ३५ हजार कोटी रुपयांनी अधिक आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

एमएसपी वाढविण्याचे उद्दिष्ट शेतक-यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगली किंमत देणे आणि कृषी क्षेत्राला अधिक फायदेशीर बनवणे हा आहे. एमएसपी ही केंद्र सरकारने निश्चित केलेली किमान किंमत आहे. यावर सरकार शेतक-यांना त्यांच्या मालाची हमी देते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, शेतक-यांच्या हितासाठी आज मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाने खरीप पिकांसाठी १४ पिकांसाठी एमएसपी मंजूर केला आहे. भाताचा नवीन एमएसपी २,३०० रुपये करण्यात आला. जो मागील एमएसपीपेक्षा ११७ रुपये अधिक आहे. कापसाचा नवीन एमएसपी ७,१२१ रुपये आणि दुस-या जातीसाठी ७,५२१ रुपये एमएसपी मंजूर करण्यात आला. जो मागील एमएसपीपेक्षा ५०१ रुपये अधिक आहे. २०१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने शेतक-यांना त्यांच्या पिकाच्या किमतीच्या किमान दीडपट एमएसपी दिला जाईल, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. हे तत्त्व लक्षात घेऊन मंत्रिमंडळाने आज एमएसपीचे दर निश्चित केले आहेत, असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

नवीन एमएसपी दर
वाण    प्रतिक्विंटल दर
ज्वारी : ३,३७१
नाचणी : २,४९०
बाजरी : २,६२५
मका : २,२२५
मूग : ८,६८२
तूर : ७,५५०
उडीद : ७,४००
तीळ : ९,२६७
भुईमुग : ६,७८३
रेप सीड : ८,७१७
सूर्यफुल : ७,२८०
सोयाबीन : ४,८९२
कापूस : ७,१२१
भात : २,३००

 

 

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR