मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला. हे लक्षात घेऊन ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणा-या शपथविधी सोहळ्याला जवळपास १५ हजार लाडक्या बहिणी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले असून, याचे नियोजन भाजपाने केले आहे. यासोबतच २ हजार शेतकरीदेखील उपस्थित राहणार असून, त्यांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टीसह १८ घटक पक्ष महायुतीत आहेत. आढावा बैठकीत प्रत्येकाच्या जबाबदा-या निश्चित केल्या आहेत. या शपथविधी सोहळ््याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, पियुष गोयल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ््याला १५ हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी उपस्थित राहणार असून, त्यांच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
भाजपाकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, अरुणाचलचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
साधू संतांचीही मांदियाळी
महायुती सरकारच्या शपथविधीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी नाणिजचे नरेंद्र महाराज, भगवानगडाचे नामदेव शास्त्री महाराज, इस्कॉनचे राधानाथ स्वामी महाराज, गौरांगदास महाराज, जनार्दन हरिजी महाराज, प्रसाद महाराज अंमळनेरकर, महानुभाव संप्रदायाचे मोहन महाराज यांच्यासह जैन मुनी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योग, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह बॉलिवूडचे कलाकारही उपस्थित राहणार आहेत.