पोर्ट ब्लेअर : अंदमान आणि निकोबार बेट पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत १५० कोटी रुपयांचे २५२ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहे. यासोबतच ६९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या कालावधीत सुमारे 10कोटी रुपये किमतीचे एक किलो कोकेन, गांजा (४९ किलोग्रॅम), गांजाचे रोप (तीन किलो), खोकल्याच्या सिरपच्या ४९७ बाटल्या आणि अल्प्राझोलमच्या ५८३ गोळ्या जप्त केल्या आहेत. पोलिस महासंचालक (डीजीपी) देवेश चंद्र श्रीवास्तव यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे.
एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांखाली नोंदवलेल्या दोन प्रकरणांमध्ये १,५२४ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले, जे कोलकाता झोनच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे हस्तांतरित करण्यात आले.
श्रीवास्तव यांनी जूनमध्ये डीजीपी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी बेटावरील मादक पदार्थांचे संकट दूर करण्यासाठी एसपी (सीआयडी) राजीव रंजन यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्स तयार केली. जून ते नोव्हेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीत २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले.