मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या १५४ नव्या रुग्णांची भर पडली. तथापि, आजच्या दिवशी १७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शनिवारी राज्यात दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९८.१७ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यू दर हा १.८१ टक्के इतका आहे.
राज्यात शनिवारी कोरोनाच्या १४,७९० चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये २,४२१ इतक्या आरटीपीसीआर चाचण्या होत्या तर १२,३६९ इतक्या चाचण्या या RAT चाचण्या आहेत. आजच्या दिवसाचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा १.०४ टक्के इतका आहे.
राज्यातील जे-१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ही १३९ इतकी आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुण्यात एकूण ९१ रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये ३० रुग्णांची नोंद करण्यात आली. त्या खालोखाल ठाण्यामध्ये ५ तर बीडमध्ये ३, छत्रपती संभाजीनगरमध्ये २ आणि नांदेडमध्ये २ रुग्णांची नोंद करण्यात आली.