इस्लामाबाद : पाकिस्तानच्या १६ अणुशास्त्रज्ञांचे टीटीपी अर्थात तहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने अपहरण केले आहे. अपहरण करण्यात आलेल्या १६ अणुशास्त्रज्ञांचा एक व्हीडीओसुद्धा या संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हीडीओमधून अपहृत अणुशास्त्रज्ञ हे पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करण्याची आणि आपले रक्षण करण्याची विनंती करताना दिसत आहेत. सध्या पाकिस्तानच्या आण्विक ऊर्जा आयोगाचे हे १६ तज्ज्ञ टीटीपीच्या ताब्यात आहेत.
दरम्यान, हा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार टीटीपीने डेरा इस्माइल खान येथे पाकिस्तानच्या ऊर्जा आयोगाच्या या तज्ज्ञांना पकडले आहे. आता पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञांची झालेली ही अवस्था म्हणजे पाकिस्तानमधील बिघडत असलेली सुरक्षा व्यवस्था आणि लष्कराच्या हतबलतेचे उदाहरण आहे अशी टीका करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या युरेनियमच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात युरेनियम लुटून नेल्याचा दावाही करण्यात येत आहे.
हे युरेनियम अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येते. दरम्यान, या अपहरण कांडाबाबत टीटीपीच्या नेत्यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही अणुऊर्जा अधिका-यांना कुठलीही इजा पोहोचवण्याच्या इराद्याने त्यांचे अपहरण केलेले नाही. तर काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी ताब्यात घेतले आहे. सरकारने आमचे हल्ल्यांपासून वाचवावे आणि लोकांच्या जीविताचे रक्षण करावे, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.