24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रकारागृहात मांसाहार, मिठाईसह मिळतात १६७ खाद्यपदार्थ!

कारागृहात मांसाहार, मिठाईसह मिळतात १६७ खाद्यपदार्थ!

कोल्हापूर : कारागृहातील शिक्षा भोगणा-या गुन्हेगारांना आपण घरात खातो त्याहीपेक्षा जास्त आहार शासकीय खर्चातून मिळतो. शिवाय कारागृहातील कॅन्टीनमध्ये अंडी, चिकन, मिठाई यासह १६७ वस्तू उपलब्ध असतात. अमली पदार्थ वगळता इतर बहुतांश वस्तू कैद्यांना स्वखर्चातून मिळतात, त्यामुळे शिक्षेदरम्यानही कैद्यांची चंगळ असते.

केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना कैद्याला पश्चाताप व्हावा, यासाठी पूर्वी अनेक प्रकारच्या यातना दिल्या जायच्या. शारीरिक कष्ट करून घेऊन त्याला पुरेसे खायला दिले जात नव्हते. याशिवाय मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे कैद्यांसाठी कारागृहातील जगणे कठीण ठरत होते. मात्र, कालांतराने कैद्यांनाही त्यांचे अधिकार मिळायला हवेत, या मानवतावादी दृष्टिकोनातून त्यांना सुविधा पुरवल्या जात आहेत. यामुळे कारागृहातील कैद्यांचे जगणे सुस ठरत आहे.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात सध्या सुमारे २१०० कैदी शिक्षा भोगतात. त्यांना रोज सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान चहा दिला जातो. आठ वाजता नाष्टा. यात कांदेपोहे, उपमा, शिरा यापैकी एक पदार्थ आणि दूध दिले जाते. सकाळी दहा वाजता जेवणाची वेळ होते. यात तीन चपात्या, भाजी, वरण, भात आणि केळी असे असते. दुपारी तीनला चहा मिळतो. सायंकाळी पाच वाजता जेवण दिले जाते. हे जेवण कैदी त्यांच्या सोयीने कधीही खाऊ शकतात. आठवड्यातून एकदा खीर, अंडी किंवा सणासुदीला गोड पदार्थांची मेजवानी असते. हा सर्व आहार शासकीय खर्चातून मिळतो.

स्वखर्चातून बरेच काही उपलब्ध
कारागृहातील कॅन्टीनमध्ये अंडी, चिकन, सुका मेवा, फरसाण, चिवडा, शेंगदाणे, चुरमुरे, चिक्की, चॉकलेट्स, मिठाई असे अनेक खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. हे पदार्थ कैद्यांना स्वखर्चातून घ्यावे लागतात. यासाठी त्यांना दरमहा नातेवाईकांकडून मनीऑर्डर स्वीकारता येते. तसेच कारागृहात केलेल्या कामाचा मेहनताना मिळतो. यातून ते खाद्यपदार्थांचा खर्च भागवतात.

करमणूक आणि शिक्षणाचीही सोय
कैद्यांच्या करमणुकीसाठी कारागृहात खेळाची साधने उपलब्ध असतात. मोकळ्या वेळेत कैदी खेळ खेळून मनोरंजन करतात. याशिवाय कारागृहातून शिक्षणही घेता येते. त्यासाठी शिक्षक आणि वाचनालयाची सोय असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR