नवी दिल्ली : सध्या देशात कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे अश्लील आणि हिंसक कंटेंट दाखवला जातो. मात्र आता अशा प्लॅटफॉर्म्सवर मोदी सरकारने कारवाई केली. व्हल्गर कंटेंट दाखवणा-या १८ ओटीटी प्लॅटफॉर्म्स केंद्र सरकारने ब्लॉक केले आहेत. सोबतच अशा वेबसाईट्स, ऍप्स आणि या ओटीटींचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत.
आयबी मंत्रालयाने ही कारवाई केली. ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या १९ वेबसाईट्स, १० ऍप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्सना ब्लॉक करण्यात आले आहे. यापूर्वी भारत सरकारने गेल्या वर्षी नेटफ्लिक्स, डिज्नी आणि इतर मुख्य ओटीटींना आपल्या कंटेंटचे स्वतंत्रपणे मॉडरेशन करण्यास सांगितले होते.
ब्लॉक केलेले ओटीटी
कारवाई करण्यात आलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये कित्येक मोठी नावे आहेत. संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे –
रॅबिट, निऑन एक्स व्हीआयपी, हंटर्स, हॉट शॉट्स व्हीआयपी, मोजफ्लिक्स, मूडएक्स, बेशरम्स, अनकट अड्डा, ट्रिफ्लिक्स, एक्स प्राईम, न्यूफ्लिक्स, प्राईम प्ले, चिकूफ्लिक्स, फुगी, एक्स्ट्रामूड, ड्रीम्स फिल्म्स, वूव्ही आणि येस्मा.
केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मच नाही, तर असे कंटेंट दाखवणा-या वेबसाईट्स, ऍप्स आणि सोशल मीडिया हँडल्सनाही ब्लॉक करण्यात आले आहे. यामध्ये १२ फेसबुक पेजेस, १७ इन्स्टाग्राम पेजेस, १६ एक्स (ट्विटर) हँडल्स आणि १२ यूट्यूब चॅनल्सचा समावेश आहे. एकूण १९ वेबसाईट्स, १० ऍप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल्स ब्लॉक करण्यात आले आहेत.