इस्लामाबाद : पाकिस्तानचे सैनिक आणि अफगाणिस्तानच्या सैन्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. पाकिस्तानी लष्करी विमानांनी अफगाणिस्तानच्या पूर्व पक्तिका प्रांतावर बॉम्बफेक केल्यानंतर काबूलने प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर अफगाण आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये भीषण संघर्ष सुरू असून त्यात १९ पाकिस्तानी सैनिक आणि तीन अफगाण नागरिक ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात भीषण लढाई सुरू आहे.
अफगाणिस्तानच्या सैन्याने खोस्त प्रांतातील अली शिर जिल्ह्यात अनेक पाकिस्तानी लष्करी चौक्यांना आग लावली आणि पाक्टिका प्रांतातील दांड-ए-पाटन जिल्ह्यातील दोन पाकिस्तानी चौक्यांवर कब्जा केला असल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी दिलेली माहिती अशी, पाकिस्तानच्या प्राणघातक हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून त्यांच्या लष्करी दलांनी पाकिस्तानमधील अनेक लक्ष्यांना लक्ष्य केले. पाकने गेल्या मंगळवारी पक्तिका प्रांतातील सात गावांवर हवाई हल्ले केले होते.
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी आणि बंडखोरांना ठार करण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली होती. या हल्ल्यात किमान ४६ लोक मारले गेले, यात महिला आणि लहान मुले आहेत. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी अफगाणिस्तानने १५ हजार सैनिक पाठवले आहेत. शनिवारी अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर पोस्ट केली की, त्यांच्या सैन्याने पाकिस्तानी स्थानांना लक्ष्य केले.
२४ तासांत दोन स्फोट
मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावरजामी यांनी हल्ल्यांबाबत अधिक माहिती दिली नाही. अफगाण सैन्याला पाठिंबा देण्यासाठी हजारो लोक घराबाहेर पडले. दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबूल गेल्या २४ तासांत दोन स्फोटांनी हादरली. शनिवारी सकाळी १० वाजता काबूलमधील शेख झायेद रुग्णालयासमोरील गृह मंत्रालयाच्या कार्यालयाजवळ स्फोट झाल्याचे वृत्त आहे.