प्राजक्ता माळी यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात प्राजक्ता माळी यांनी धस यांना माफी मागण्याची विनंती केली. परंतु धस यांनी त्यास नकार दिला. त्याचवेळी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बदनामी करणा-यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हीडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवरसुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत परळी पॅटर्नबद्दल वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. एवढेच नव्हे, तर माझी बदनामी करणा-या यूट्यूबर, सोशल मीडियावरील लोकांबद्दलही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.