26.3 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्र२.४६ कोटी लाडक्या बहि­णींच्या खात्यावर पैसे जमा

२.४६ कोटी लाडक्या बहि­णींच्या खात्यावर पैसे जमा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील लाडक्या बहि­णींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा (सहावा हप्ता) हप्ता जमा झाला आहे. सहाव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत ३,६८९ कोटी रुपये दिले आहेत. डिसेंबर महिन्यात राज्यातील २.४६ कोटी लाडक्या बहि­णींना सहावा हप्ता मिळाला. ऑक्टोबर महिन्यापेक्षा ही संख्या जास्त आहे.

ऑक्टोबर महिन्यात २.३४ कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला होता. त्यामध्ये डिसेंबर महिन्यात १२ लाखांनी वाढ झाली आहे. आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेल्या महिलांची ही संख्या असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिका-यांनी सांगितले.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिनाअखेरपर्यंत डिसेंबरचा हप्ता जमा होईल, असे आश्वासन दिले होते. सहाव्या हप्त्याच्या पैशांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. २.४६ कोटी लाभार्थींचा समावेश केला, ज्यात १२ लाख महिलांचा समावेश आहे. ज्यांची बँक खाती आधी आधार सीडिंग केलेली नव्हती, असे एका अधिका-यांनी सांगितले.

जुलै २०२४ पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत २१६०० कोटी रुपये लाडक्या बहि­णींच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, ऑक्टोबरपर्यंत १७०० कोटी रुपये लाडक्या बहि­णींच्या खात्यावर जमा झाले होते. आता सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटी जमा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील २.३४ कोटी कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला होता.

१२ लाख नव्या लाडक्या बहि­णींच्या खात्यावर पैसे जमा
विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकाच वेळी दिला होता. ९ ऑक्टोबरच्या आधी दोन महिन्यांचे हप्ते एकत्र दिले होते. राज्यातील २.३४ कोटी महिलांना त्यावेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे पोहोचले होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत राज्यातील १२ लाख लाडक्या बहि­णींनी आधार सिडिंग केले. त्या सर्व महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात पैसे मिळाले आहेत, असे अधिका-याने सांगितले.

तक्रारी आल्या, पुढे काय?
लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्याचेही महिला बालविकास मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले. माहितीनुसार, या योजनेबाबत काही तक्रारीही नोंदवल्या आहेत. त्यामुळे अधिकारी बारीक लक्ष ठेवून आहेत. प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींवर सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी मंत्रिमंडळ अधिवेशनात याचे निराकरण होण्याची शक्यता अधिका-यांनी व्यक्त केली.

कागदपत्रांची पडताळणी होणार का?
डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत, त्यांचा पुढील हप्त्यावेळी समावेश केला जाईल असे आदिती तटकरे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. कोणत्याही वादग्रस्त अर्जांच्या समावेशाबाबत पुनरतपासणी केली जाईल.

अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला?
नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, पदभार घेतल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी केली जाईल.
अपात्र असलेल्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही, त्यांना बाहेर काढले जाईल. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या महिलांनी नियम आणि अटींचे पालन केले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर छाननी होईल, काही अपात्र लाभार्थ्यांनी स्वत:हून या योजनेतून बाहेर पडावे.

२१०० रुपये कधीपासून मिळणार?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आगामी आर्थिक वर्षापासून २१०० रुपये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी २.६ कोटींपेक्षा जास्त आहेच. त्यासाठी दर महिना ३,७०० कोटी रुपये खर्च होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR