25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात २ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये आयईडी स्फोटात २ जवान शहीद

नक्षल्यांनी केली स्फोटकांची पेरणी, नक्षलविरोधी अभियान वेगात

गडचिरोली : प्रतिनिधी
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सिल्गर आणि टेकुलगुडम दरम्यान माओवाद्यांनी मोठा आयईडी स्फोट घडवला. या स्फोटात २ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे तर अनेक जवान जखमी झाले आहेत. एकीकडे सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असताना दुसरीकडे माओवाद्यांनी जवानांच्या ट्रकला लक्ष्य केले. नक्षलविरोधी अभियानावर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर हा हल्ला करण्यात आला. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

२०१ कोब्रा वाहिनीची अ‍ॅडव्हान्स पार्टी जागरगुंडा पोलिस स्टेशन हद्दीतील कॅम्प सिल्गर येथून आरओपी ड्युटी दरम्यान ट्रक आणि दुचाकीने कॅम्प टेकलगुडेमकडे जात होते. याचवेळी नक्षलवाद्यांनी सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता. दरम्यान, आज दुपारी ३ च्या सुमारास २०१ कोब्रा कॉर्प्सच्या एका ट्रकवर आयईडी स्फोट घडवून आणला. ज्यामध्ये चालक आणि सहचालक जागीच शहीद झाले असून उर्वरित सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती आहे. यात शहीद जवानांची नावे विष्णू आर आणि शैलेंद्र अशी सांगण्यात येत आहेत.

माओवादी बनवत होते बनावट नोटा
सुकमा जिल्ह्यातील कोराजगुडा जंगलात राबविण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले. कोराजगुडा जंगलात माओवादी चक्क बनावट नोटा बनवत असल्याचे आढळून आले. यात ५०, १००, २०० आणि ५०० ​​रुपयांच्या बनावट नोटांचे नमुने आढळून आले. पश्चिम बस्तर भागात २०२२ पासून माओवादी बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण देत होते, असे तपासातून पुढे आले.

गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई
सुकमा जिल्ह्यातील जंगलात बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. जवानांच्या संयुक्त दलाला या कारवाईत मोठे यश मिळाले.

नक्षली म्होरक्याचे पत्नीसह आत्मसमर्पण
गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणा-या गिरधरने आज पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यावेळी नक्षली दाम्पत्याला पुनर्वसनासाठी २५ लाख रुपयांची मदत देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR