17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतक-यांना कर्जमाफी

लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतक-यांना कर्जमाफी

भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पीयूष गोयल, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
भाजपच्या संकल्पपत्रात लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देण्यात येणार आहेत. तसेच शेतक-यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या संकल्पपत्रात महिला, विद्यार्थी, वृद्ध यांच्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबतच यात रोजगार, व्यवसाय यांसह विविध मुद्यांवरही पुढील ५ वर्षांत भर देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाच्या घोषणा
लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५०० रुपयांवरून २१०० रुपये दिले जाणार
महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण
महिलांच्या सुरक्षेसाठी २५००० महिलांचा पोलिस दलात समावेश केला जाणार
शेतक-यांना कर्जमाफी दिली जाणार
शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजारवरून १५ हजार रुपये दिले जाणार
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येणार
वृद्ध पेन्शनधारकांना १५०० वरून २१०० रुपये दिले जाणार
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार
२५ लाख रोजगारनिर्मिती
महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन
ग्रामीण भागात ४५ हजार गावांत पाणंद रस्ते बांधणार
अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करून त्यांना दर महिना १५ हजार वेतन आणि विमा संरक्षण देणार
वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत व्हिजन महाराष्ट्र @२०२९ सादर केले जाणार
२०२८ पर्यंत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य
‘मेक इन महाराष्ट्र’ धोरण राबविणार
महाराष्ट्राला जागतिक फिनटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता राजधानी बनवणार
पहिल्या विशेष अक विद्यापीठाची स्थापना करणार
नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नाशिकला आधुनिक एरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादन केंद्र बनवणार
शेतक-यांनी खरेदी केलेल्या खतांवरील जीएसटी अनुदानाच्या रूपात परत देणार
शेतक-यांना प्रति क्विंटल ६००० भाव मिळावा म्हणून सोयाबीन उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनासाठी समर्पित संपूर्ण शृंखला स्थापन
२०२७ पर्यंत महाराष्ट्रात ५० लक्ष लखपती दीदी तयार करणार, प्रत्येकी ५०० स्वयंसहायता गटाचे एक औद्योगिक क्लस्टर तयार करण्यात येईल आणि १००० कोटींचा प्रारंभिक फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार
अक्षय अन्न योजनेंतर्गत कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना दरमहा मोफत शिधा देण्यात येणार, यात तांदूळ, ज्वारी, शेंगदाण्याचे तेल, मीठ, साखर, हळद, मोहरी, जिरे आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश असणार
महारथी अटल टिंकरिंग लॅब्स योजना सुरू करणार
महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करण्यात येणार
छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्यात येणार. यात को वर्किंग स्पेस, इन्क्युबेशन सुविधा असतील. यातून १० लाख नवीन उद्योजक तयार केले जाणार
अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी १५ लाखांपर्यंत व्याजरहित कर्ज देण्यात येणार ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, व्हीजेएनटीमधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार
१८ ते ३५ वयोगटातील आरोग्य तपासणीसाठी स्वामी विवेकानंद आरोग्य कार्ड सुरू करण्यात येणार
नशामुक्त-व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी कायमस्वरूपी योजना लागू करण्यात येणार
गड-किल्ले विकास प्राधिकरण स्थापन करणार
ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य धोरण स्वीकारणार – आधार सक्षम सेवा वितरण लागू करणे, आरोग्य नोंदी, ओळखपत्रे आणि पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट घरी पोहोचवण्याची व्यवस्था
बळजबरी आणि फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कठोर कायदा करणार
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी एआय तंत्रज्ञान, ड्रोन आणि रेडिओ कॉलर तंत्रज्ञानाचा वापर.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR