मुंबई : काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविणा-या २८ बंडखोरांवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. या सर्वाना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाची कारवाई झालेल्या बंडखोरांमध्ये माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार सुरेश जेथलिया, आनंदराव गेडाम, विजय खडसे आदींचा समावेश आहे.
काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जागावाटप झाल्याने काँग्रेसच्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. महाविकास आघाडीच्या धर्मानुसार काँग्रेसने या बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यानुसार शामकांत सनेर (शिंदखेडा), राजेंद्र ठाकूर (श्रीवर्धन), आबा बागुल (पर्वती), मनीष आनंद (शिवाजीनगर) सुरेश जेथलिया, कल्याण बोराडे (परतूर), राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे (रामटेक), आनंदराव गेडाम, शिलू चिमूरकर (आरमोरी), सोनल कोवे, भरत येरमे (गडचिरोली), अभिलाषा गावतुरे, राजू झोडे (बल्लारपूर), प्रेमसागर गणवीर (भंडारा), विलास पाटील, आसमा जव्वाद चिखलेकर (भिवंडी), अजय लांजेवार (अर्जुनी मोरगाव), हंसकुमार पांडे (मीरा-भाईंदर), कमल व्यवहारे (कसबा पेठ), मोहनराव दांडेकर (पलूस-कडेगाव), अहमदनगर शहर (मंगल विलास भुजबळ), मनोज शिंदे, सुरेश खेडे पाटील (कोपरी पाचपाखाडी), विजय खडसे (उमरेड), शबीर खान (यवतमाळ), अविनाश लाड (राजापूर), याज्ञवल्क्य जिचकार (काटोल) यांना काँग्रेसने सहा वर्षासाठी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.