नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबई परिसरातील उलवेच्या जावळे गावात बुधवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये आई, मुलगा आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक व्यक्ती गंभीर भाजल्यामुळे जखमी झाला. त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दरम्यान, दिवाळीच्या पूर्वसंध्येला दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. उलवे येथील जावळे गावात एका किराणा दुकानात ५ किलोच्या २ सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे नवी मुंबई शहर आणि परिसरात दिवाळीचा उत्साह सुरू आहे. दुसरीकडे सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा बळी गेला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हृदयद्रावक घटना घडल्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
स्फोटाची तीव्रता भयानक होती. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात नेताना प्राण सोडला. मृत्यू झालेल्यांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे. त्यात ३८ वर्षीय महिला, एक १५ वर्षांची मुलगी असून एक ८ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.