मुंबई : प्रतिनिधी
सोने आणि चांदी हे दोन मौल्यवान धातू आहेत. या दोन्ही धातूंचे आता खूप महत्त्व वाढले आहे. दरवर्षी सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आता दिवाळी सणाला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.
दिवाळीआधी धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून अनेकजण सोने खरेदी करतात. पण सोन्यात गुंतवणूक केल्यास खरेच फायदा होतो का, याची प्रचिती अलिकडे आली आहे. कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खूप महागले आहे. गेल्या वर्षी १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी होती. त्या दिवशी सोन्याचा भाव ६०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. यंदा सोने ८० हजारांच्याही पुढे गेले आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणे हे शुभ मानले जाते. त्यामुळे यावर्षीदेखील धनत्रयोदशीला सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. सोन्यात केलेल्या गुंतवणुकीचा परतावा जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली, हे समजून घेणे गरजेचे आहे. वर्षभरात सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत गेला आहे. या एका वर्षात सोन्यात गुंतवणूक करणा-यांना तब्बल ३० टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले. म्हणजेच २०२४ साली इक्विटी मार्केटच्या बरोबरीने सोन्याने गुंतवणूकदारांना रिटर्न्स दिले आहेत.
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी होती. त्या दिवशी सोन्याचा भाव ६०,७५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. या वर्षी सोने ८० हजारांच्याही पुढे गेले आहे. शेअर बाजाराशी तुलना करायची झाल्यास सेन्सेक्स गेल्या सहा महिन्यांत फक्त ८ टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याच्या भावात सतत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वैश्विक तणाव, महागाई अशी अनेक संकटे असूनही वर्षभरात सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला आहे. इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सोन्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते.
सोन्याच्या दरात अलिकडे सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वाढती मागणी आणि वाढते दर लक्षात घेता आगामी काळात सोने १ लाख रुपये तोळा होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. सोन्याच्या किमती वाढत चालल्याने गुंतवणूकदारही इतरत्र गुंतवणूक करण्याऐवजी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीवर भर देत आहेत. त्यामुळे धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी पुन्हा झुंबड उडालेली पाहायला मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
लग्नसराईत सोन्याचा भाव आणखी वाढणार?
यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ होऊ शकते. त्यानंतर दिवाळी आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होईल. त्यामुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ होऊ शकते. गुंतवणूकदारांच्या मतानुसार सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण आता गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. गुंततवणूकदार गोल्ड ईटीएफमध्येही गुंतवणूक करू शकतात.