27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रपरभणीत ३४, नांदेडला २३ उमेदवार मैदानात

परभणीत ३४, नांदेडला २३ उमेदवार मैदानात

मुंबई : प्रतिनिधी
दुस-या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या ८ मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. अंतिमत: या ८ मतदारसंघात २०४ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक ३७ उमेदवार रिंगणात आहेत तर सर्वात कमी १५ उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघात आहेत. दरम्यान, या टप्प्यात मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार असून, परभणीत सर्वाधिक ३४, हिंगोलीत ३३ आणि नांदेडमध्ये २३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात येत्या २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या ८ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतर येथील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिंगोलीतून शंकर सिदम तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने परभणीतून राजन क्षीरसागर यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. महाविकास आघाडीच्या वतीने या दोन्ही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार दिले आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी माघार घेतली आहे. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीमधून आपली उमेदवारी कायम ठेवली असून वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दुस-या टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या ८ मतदारसंघात २०४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ३७ तर सर्वात कमी म्हणजे १५ उमेदवार अकोला लोकसभा मतदारसंघात आहेत.

दुस-या टप्प्यातील उमेदवारांची संख्या
बुलढाणा-२१, अकोला-१५, अमरावती- ३७, वर्धा- २४, यवतमाळ -वाशिम-१७, हिंगोली- ३३, नांदेड – २३, परभणी-३४.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR