मुंबई : विशेष प्रतिनिधी
एकट्या महायुतीतच एक दोन नाही तर जवळपास ३६ जणांनी बंडखोरी केलेली आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत ही बाब वेगळीच आहे. परंतु, असंतुष्टांनी देखील मोठ्या प्रमाणावर बंड केल्याने हे बंड शमविण्याचे काम आता वरिष्ठांना करावे लागत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जेमतेम १७-१८ दिवस राहिले आहेत. त्यात दिवाळीचा सण आहे. यामुळे प्रचारात अडथळे येत आहेत. अशातच येत्या तीन दिवसांत बंडोबांचे बंड थंड करावे लागणार आहे. जर या बंडोबांचे बंड कायम राहिले तर राज्यातील ५० जागांवरील निकाल फिरण्याची शक्यता आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.
एकट्या महायुतीतच ३६ बंडखोर उभे ठाकले आहेत. भाजपाने साम-दाम-दंड-भेद वापरून बंडखोरीच्या तयारीत असलेल्या काही नेत्यांना थंड केले आहे. परंतू, सर्वाधिक बंडखोर हे भाजपाचेच असल्याने आता शिंदे आणि अजित पवार गटही आक्रमक होत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बंडखोरांनी १६ जागांवर आव्हान उभे केले आहे. अजित पवारांच्या पक्षाचा एकच बंडखोर आहे.
याउलट परिस्थिती मविआमध्ये आहे. मविआत १४ जागांवर बंडखोर उभे राहिले आहेत. यात काँग्रेस आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाविरोधात काँग्रेसच्या १० जणांनी बंडखोरी केलेली आहे. चार जागांवर उद्धव ठाकरेंच्या बंडखोरांनी काँग्रेस विरोधात उमेदवारी दिली आहे.
‘मविआ’तील ११ बंडखोर….
ज्योती मेटे (बीड), राजाभाऊ फड (परळी), सुरेश नागरे (जिंतूर), दिलीप माने (दक्षिण सोलापूर), बाबासाहेब देशमुख (सांगोला), हर्षल माने (एरंडोल), कमल व्यवहारे (कसबा), राहुल जगताप (श्रीगोंदा), अविनाश लाड, उदय बने (राजापूर), मधु चव्हाण (भायखळा).