मुंबई : प्रतिनिधी
राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ३१ जागा अशा होत्या, जिथे विजयाचे अंतर ५ हजारांपेक्षा कमी होते. या ३१ पैकी १६ मतदारसंघात महाविकास आघाडीने लीड घेतली होती तर १५ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली होती. तसेच ६ जागांवरील उमेदवार अगदी काठावर पास झाले. या निकालाकडे पाहिले तर ३७ जागांवर कोण बाजी मारणार यावर सत्ता कोणाला मिळेल, याचा फैसला होऊ शकतो.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जागेवर जोरदार चुरस सुरू आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवार सर्व काही करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ३७ जागा अशा होत्या येथे जय-पराजयाचे अंतर ५ हजारपेक्षा कमी होते. २०१९ मध्ये राज्यातील २८८ पैकी ५ जागा अशा होत्या, ज्यात विजयाचे अंतर १ हजारपेक्षा कमी होते. एक जागा तर अशी होती की, येथे विजयाचे अंतर ५०० पेक्षा कमी होते. हा विजय शिवसेनेच्या भाऊसाहेब लांडे यांनी मिळविला. चांदिवली मतदारसंघातून त्यांनी फक्त ४०९ मतांनी विजय मिळवला होता.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव मतदारसंघातून गोवर्धन चंद्रिकापुरे यांनी ७१८ मतांनी विजय मिळवला होता तर पुण्यातील दौंडमधून राहुल कुल यांनी ७४६ मतांनी बाजी मारली होती. असाच विजय सांगोल्यामधून शाहजी बापू पाटील यांनी मिळवला होता, त्यांनी ७६८ मतांनी विजय मिळवला. नगरमधील कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशुतोष काळे यांनी ८२२ मतांनी बाजी मारली होती.
या शिवाय एक दो दोन हजार मतांच्या फरकाने भिवंडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताईनगर आणि बीड येथील निकाल लागले होते. या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, सपा आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले. २०१९ साली २८ जागा अशा होत्या, येथे विजयाचे अंतर २ ते ५ हजार इतके होते. यातील १२ जागांवर भाजपने, ६ जागांवर राष्ट्रवादी, ४ जागा काँग्रेस, २ जागा शिवसेना तर एआयएमआयएम, बहुजन विकास आघाडी, भाकप यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती.