गंगापूर : उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात हैदराबाद येथील चार जण ठार, तर ११ जण जखमी झाल्याची घटना गंगापूर- वैजापूर मार्गावर शिल्लेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत तांबूळगोटा फाटा येथे बुधवारी रात्री १०:०० वाजेच्या सुमारास घडली. वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी (वय ६ महिने), अक्षिता गडकुनुरी (वय २१ वर्षे) व प्रेमलता श्यामशेट्टी (वय ५८ वर्षे), प्रसन्ना लक्ष्मी (वय ४५), अशी मृतांची नावे आहेत.
हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी (दि.१४) रोजी शिर्डी येथे बसद्वारे दर्शनाला आले होते. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन हे सर्व भाविक बुधवारी (दि.१५) सकाळी शिर्डी येथील जीप (एमएच १७ बीडी १८९७) द्वारे छत्रपती संभाजीनगर, वेरूळ लेण्या पाहून व घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा गंगापूरमार्गे शिर्डीला जात होते. रात्री १०:०० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे महालगावकडे ऊस घेऊन जाणा-या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला (एमएच २० एफयू २६३३) या भाविकांच्या जीपने पाठीमागून धडक दिली. या अपघातात वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी, अक्षिता गडकुनुरी व प्रेमलता श्यामशेट्टी हे गंभीर, तर रामा वसंत कापुरे (जीपचालक रा. शिर्डी), रामबाबू बज्जुरी (वय ४३ वर्षे), प्रणाली (वय १२), शेवंती (वय ३७), दीपक (वय ७), व्यंकय्या (वय ३८), प्रेमलता (वय ५०), शरण्या श्रीनिवास (वय १७), रमादेवी (वय ५५), कृष्णा मूर्ती (वय ६५), यामिनी (वय ३५ वर्षे, रा. सर्व रा. एलबीनगर, स्वरूपनगर, हैदराबाद, तेलंगणा) हे जखमी झाले.
छत्रपती संभाजीनगरात जखमींवर उपचार सुरू
याचवेळी गंगापूर पोलिस ठाण्याचे पोकॉ मेजर आर.आय. शेख व प्रवीण प्रधान हे महालगाव येथून बंदोबस्तावरून परत येत होते. त्यांना हा अपघात दिसला. त्यांनी सर्व जखमींना पोलिसांच्या जीपमध्ये टाकून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी, अक्षिता गडकुनुरी व प्रेमलता श्यामशेट्टी यांना मयत घोषित केले. जखमींवर डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. विशाल सूर्यवंशी, बाळू घोडके, शीतल उदावंत, मंदा त्रिभुवन, मुन्ना भोसले, प्रफुल्ल गायकवाड, आशाबाई आदींनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.