मुंबई : प्रतिनिधी
नव्या विधानसभेत सत्ताधा-यांकडे प्रचंड बहुमत असल्याने विरोधकांचे संख्याबळ अतिशय कमी आहे. विरोधी बाकांवर असलेल्या महाविकास आघाडीची एकूण संख्या ५० च्या पुढे जात नाही. आघाडीतील एकाही पक्षाचे २० पेक्षा अधिक आमदार नाही. असे असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवत विरोधी बाकांवरील ४ आमदारांना कामकाज सल्लागार समितीत स्थान दिले. नार्वेकर सलग दुस-यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवडून आले आहेत. दुस-यांदा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला.
कामकाज सल्लागार समितीवर एखाद्या आमदाराची नेमणूक करताना त्याच्या पक्षाचे विधानसभेत किमान २२ सदस्य असावे असतात. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीवर विरोधकांना स्थान देण्यात अडचण होती. पण अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर केला. त्यांनी दिलदारपणा दाखवत १२ सदस्यीय समितीत विरोधी पक्षातील ४ नेत्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील प्रभू, काँग्रेसचे नाना पटोले या चौघांची नेमणूक नार्वेकरांनी कामकाज सल्लागार समितीवर केली. कामकाज सल्लागार समितीवर संधी देताना त्या पक्षाचे विधानसभेत किमान २२ सदस्य असावेत, अशी अट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शपचे १०, काँग्रेसचे १६, शिवसेना ठाकरे गटाचे २० आमदार विधानसभेत आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचण होती. पण नार्वेकरांनी विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसताना मनाचा मोठेपणा दाखवत विशेषाधिकार वापरला.