19.3 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeराष्ट्रीयमनू भाकर, गुकेशसह ४ जण खेलरत्न तर स्वप्नील कुसाळे अर्जुन पुरस्काराने सन्मानित

मनू भाकर, गुकेशसह ४ जण खेलरत्न तर स्वप्नील कुसाळे अर्जुन पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धांत २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते डबल ऑलिंपिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश, दोन वेळेचा ऑलिंपिक पदक विजेता आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिंपिक सुवर्णपदक विजेता उंच उडीपटू प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी. गुकेश याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय पुरुष हॉकी खेळाडू जरमनप्रीत सिंग, संजय, अभिषेक आणि सुखजीत सिंग आणि महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर दीपाली देशपांडे यांना द्रौणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ही गुरु-शिष्याची जोडी महाराष्ट्रातील आहे. याशिवाय ४ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न, ३२ जणांना अर्जुन, २ जणांना जीवनगौरव श्रेणीतील अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ५ प्रशिक्षकांना द्रौणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनू भाकरने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकच्या १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तिने एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकून इतिहास रचला होता. १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर डी, गुकेशने ११ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक आणि २०२२ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये पुरुषांच्या उंच उडीत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR