सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात एक हजार नऊ कामे सुरु आहेत. त्यातील १३२ कामांच्या बिलांचे ४३ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठेकेदारांनी जलजीवन मिशनची शेकडो कामे बंद ठेवली आहेत. तर काही ठेकेदार कामे पूर्ण करुन घेत आहेत.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे ऑक्टोबर महिन्यात अडीच कोटी रुपयांचा निधी आला होता. त्यानंतर अद्यापही निधी आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ठेकेदार बिलांपासून वंचित आहेत. ते जिल्हा परिषदेकडे फेऱ्या मारत आहेत. महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरु केल्यापासून जलजीवन मिशनसह अनेक योजनांचा निधी वेळेवर येत नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील अनेक कामे ठप्प झाली आहेत. केलेल्या कामांची रक्कम वेळेवर मिळावी, यासाठी ठेकेदार जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, शासनाकडूनच निधी उपलब्ध होत नसल्याने अधिकारी हातबल झाले आहेत.जलजीवन मिशनच्या १३२ कामांच्या बिलांसाठी ४३ कोटी रुपयांची गरज आहे.
त्यासाठी शासनाकडे ५० कोटी रुपयांची मागणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केली आहे. मात्र, निधी अद्यापही आलेला नाही.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे जलजीवन मिशन कामांसाठी सध्या निधी उपलब्ध नाही. १३२ कामांची बिले आली आहेत. त्यासाठी ४३ कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे शासनाकडे ५० कोटी रुपयांची मागणी केली आहे.असे ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी सांगीतले.