नवी दिल्ली : संसदेत सुरक्षेच्या मुद्यावरून गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात विरोधकांनी सुरक्षेतील त्रुटींवरून सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला. विरोधी पक्षांनी बुधवारी घडलेल्या घटनेवर गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याची मागणी केली. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातून काँग्रेसच्या ५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस सदस्य टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोस यांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले आहे.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितले की, काल (बुधवार, १३ डिसेंबर) घडलेली दुर्दैवी घटना ही लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटी होती आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे. या मुद्द्यावर कोणत्याही सदस्याकडून राजकारण अपेक्षित नाही, पक्षीय राजकारणाच्या वरती जाऊन काम करावे लागेल, असे ते म्हणाले. सुरक्षेतील त्रुटींच्या अशा घटना यापूर्वीही संसदेत घडल्या असून तत्कालीन लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेनुसार कामकाज झाले आहे.
डेरेक ओब्रायन निलंबित
यापूर्वी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनाबाबत विरोधी पक्षांच्या खासदारांनी राज्यसभेत गदारोळ केला. यानंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.