मुंबई : पीक विमा योजना चांगली, परंतु त्यात गैरप्रकार झाला. जवळपास ५ हजार कोटींचा घोटाळा आहे. शेतक-यांसाठी ही योजना चांगली, परंतु त्यात दलाल, गुंड, माफिया जे चुकीच्या प्रकारे अर्ज भरतायेत त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात ही पीक विमा योजना भरणा-यांची टोळी आहे. कदाचित कृषीमंत्र्यांना याचा आवाका माहिती नाही. या योजनेत सरकारी जमीन, गायरान जमीन, वनखात्याच्या जमीन, जलसंपदाच्या विभागाच्या जमिनीवर विमा भरला आहे.
दावोसवरून मुख्यमंत्री आल्यानंतर विभागीय आयुक्त किंवा सचिव पातळीवरील अधिका-यांची नेमणूक करून या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली. मी जे आरोप केले होते, त्याचे पुरावे एसआयटीने पुढे आणले आहेत. मी हवेत केलेले आरोप नव्हते. खंडणी, खून या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे हे स्पष्ट होते. अवादा कंपनीच्या अधिका-यांना पाथर्डीपर्यंत नेले, तिथून मारत मारत पुन्हा आणले होते. १०१ टक्के आका वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, आंधळे हे आरोपी आहेत हे व्हीडीओवरून पुष्टी मिळते. या प्रकारात पीआय पाटीलला सहआरोपी केले पाहिजे. ज्यांनी खासदारांबाबत विधान केले होते त्या पोलिस अधिका-याला पुण्याला पाठवण्याऐवजी गडचिरोली, चंद्रपूरला पाठवलं पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली.
माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, निलंबित पाटीलला सहआरोपी केले पाहिजे. तो मी नव्हेच म्हणणारे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मी आहेच हे दिसून आले. मी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली. अजूनही बरेच आरोपी आहेत. या आरोपींची नावे एसआयटीला देऊ. माझ्याकडे आणखी एक भयानक गोष्ट परळीतून आली. महादेव दत्तात्रय मुंडे, कन्हेरवाडी याचा खून २२ ऑक्टोबर २०२३ ला खून झाला. परळी वैद्यनाथ तहसीलसमोर खून झाला. मृतदेह सापडला. परळीला सानप नावाचे पीआय होते. त्यांनी आरोपींचा छडा लावला परंतु त्यांच्याऐवजी दुस-याच आरोपीला पकडण्याचे आकाने सांगितले. २०२३ पासून महादेव मुंडेंचे आरोपी उघड फिरतायेत. सानप पोलिस अधिका-यावर दबाव आणला गेला. तो पोलिस अधिकारी बदली घेऊन धाराशिवला गेला असा आरोप त्यांनी केला.
तसेच महादेव मुंडे यांच्या खूनाचा तपास अजून लागला नाही. खूनी परळीत फिरतायेत. बीड पोलीस अधीक्षकांना मी भेटून सांगणार आहे. आकाने बदली करून परळीत आणलेल्या अधिका-यांची जिल्ह्याबाहेर बदली केली पाहिजे. महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचीही भेट घेणार आहे असे धस यांनी सांगितले.