पॅरीस : ३०३ भारतीयांना घेऊन दुबई ते निकाराग्वा या विमानाला फ्रान्सहून मुंबईला जाण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, परवानगी मिळून २४ तासानंतरही हे विमान उड्डाण करू शकले नाही. विमानातील काही प्रवाशांनी भारतात परतण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी काहींनी फ्रेंच सरकारकडे लेखी विनंती करत आश्रय मागितला आहे.
या प्रवाशांना आश्रय देण्याबाबत फ्रान्स सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबईहून निकाराग्वाला जाणारे चार्टर फ्लाइट ३०३ प्रवाशांना घेऊन २१ डिसेंबर रोजी ‘मानवी तस्करी’ च्या संशयावरून पॅरिसच्या १५० किमी पूर्वेला वॅट्री विमानतळावर थांबविण्यात आले.
रविवारी फ्रेंच अधिका-यांनी रोमानियन कंपनी लीजेंड एअरलाइन्सच्या ए ३४० विमानांना त्यांचा प्रवास पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० प्रवाशांनी फ्रान्समध्ये आश्रयाची कागदपत्रे दाखल केली आहेत. तर इतर अनेकांनी भारतात जाण्यास नकार दिला असल्याचे वृत्त आहे. फ्रेंच वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवासी या माघारीमुळे नाखूष आहेत. या प्रवाशांना त्यांना निकाराग्वाला त्यांचा प्रवास नियोजनाप्रमाणे सुरू ठेवायचा होता.